सत्तेत मी आलो नाही, लोकांनी आणले! ’मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

Foto

नवी दिल्‍ली: विरोधक माझ्यावर टीका करत असले तरी देशातील कोट्यवधी जनतेला विकास हवा आहे आणि त्याचसाठी जनतेने मला सेवा करण्याची पुन्हा संधी दिली. मी पुन्हा सत्तेत आलो नसून, तुम्ही लोकांनीच मला पुन्हा बोलावले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्याच मन की बात कार्यक्रमाद्वारे आज देशातील जनतेशी संवाद साधला. देशातील बहुतांश भाग आज पाणी संकटाला तोंड देत असून, लोकांचा सहभाग आणि सहाय्य यांच्या मदतीने जलसंकटावर मात करू, असा विश्‍वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्‍त केला.  

सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांनी अभूतपूर्व यश मिळवून केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीएचे सरकार सत्तेत आले. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिल्याच मन की बात कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेचे आभार मानले. यावेळी मोदी म्हणाले, निवडणुकीनंतर आपण पुन्हा भेटू असे आपण म्हणालो असताना, मोदींना इतका आत्मविश्‍वास कसा, अशा शंका उपस्थित करण्यात आल्या. मात्र, मी पुन्हा सत्तेत आलो नसून, तुम्ही लोकांनीच मला पुन्हा सत्तेत आणले आहे.

 मन की बात कार्यक्रमात जिवंतपणा होता, आपलेपणा होता, त्यात मन गुंतलेले होते आणि याच कारणांमुळे मधला काळ अतिशय खडतर वाटत होताय मन बात कार्यक्रमात भलेही मी बोलत असेन, शब्द माझे असतील, आवाज माझा असेल, मात्र कथा तुमची आहे, पुरुषार्थ तुमचा आहे, पराक्रम तुमचा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मन की बात कार्यक्रम झाला नसल्याने मला प्रत्येक रविवारी काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते, अशा भावना मोदी यांनी व्यक्‍त केल्या.
 पाणी संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना मोदी म्हणाले, सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पाणीटंचाईच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे.   पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्‍ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीने घेतले जातील. पाण्याचा प्रश्‍न हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून पाण्याचा एक-एक थेंब वाचवण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. पाणी वाचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे, कथा-कीर्तने अशा क्षेत्रात असलेल्या लोकांनी आपापल्या पद्धतीने पाणी वाचवण्याचे अभियान राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.